वडार समाज संकल्प मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- वडार समाजात वाढत चाललेली बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न, तसेच शिक्षणातील अनास्था दूर करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. वडार समाज फक्त महाराष्ट्रात एनटी संवर्गात आहे. बाजूच्या कर्नाटक राज्यात एससी संवर्गात मोडतो. त्यामुळे तिथे लाभ जास्त घेता येतात. जानेवारीमध्ये कोल्हापूर येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी लाखो वडार बांधवांनी उपस्थित राहावे. या मेळाव्यात वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्याला प्राधान्य असणार आहे, असा निर्धार ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केला.

‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे वडार समाज महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी रविवारी (दि. ३० ऑगस्ट) भोसरीतील क्वालिटी सर्कल फोरम सभागृहात वडार समाज संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात वडार समाज बांधवांना विजय चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी महापौर हनुमंतराव भोसले, महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक राहुल भोसले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पिंटूभाऊ जाधव, अवर सचिव मंत्रालय मुंबई राजेश अलकुटे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे स्वीय सहाय्यक यल्लाप्पा गाडीवडर, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष मोहिते, संपर्कप्रमुख सुधीर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, सहाय्यक संचालक मंत्रालय राजू धोत्रे, वडार एकता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत विटकर, युवक अध्यक्ष अमोल धोत्रे, साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीता जाधव, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय धोत्रे, वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे श्यामराव विटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज कलगुटकी, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, उद्योजक वसंत विटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विजय चौगुले म्हणाले, वडार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी असलेली १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसह शासनाच्या विविध योजनांतून समाजातील कुटुंबांना पक्की घरे मिळावीत, बार्टी व आर्टीच्या धर्तीवर ‘शूरवीर हरबा वडार रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ स्थापन करावे, बेरोजगारांना स्वयंरोजगार व लघुउद्योगासाठी वसंतराव नाईक भटक्या-विमुक्त विकास महामंडळाकडून विनाअट कर्ज उपलब्ध करून द्यावे. जसं आईवडिलांना विसरत नाही, तसं वडार समाजाला विसरू नका. वडार समाजाच्या पाठीशी उभे राहा, त्यांना ताकद द्या. समाजाला देव माना, कारण समाज आणि देव वेगळा नसतो. जिद्द मनामध्ये बाळगून संघटनेसाठी काम करावे. प्रशासकीय सेवेत यावे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांची व्यवस्था करण्यासाठी समाजातील अनेकांनी पुढे आले तरच अधिकारी तयार होतील.
महापौर रवी लांडगे म्हणाले, की संघटना काय असते, हे या संघटनेकडे पाहून लक्षात येते. समाजाच्या अडचणी सोडविण्याच्या मागेच समाज मागे उभे राहतो. कष्ट, जिद्द, आत्मविश्वास, प्रेमापोटी समाज एक झाला आहे. समाजाच्या मागाण्यांचा सकारात्मक विचार करू. वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभी करण्यासाठी कटीबद्ध राहू. शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच समाजाची प्रगती होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, की संघर्षावार मात करणारी माणसे भेटली की प्रेरणा मिळते. वडार समाज म्हणजे आत्मविश्वास, वडार समाज म्हणजे साहस, समाज भक्कम करण्यासाठी धडपड करणाऱ्याच्या पाठीशी राहा. आज वडार समाजाला आत्माचिंतन करण्याची गरज आहे. समस्यावर मात करून पुढे जायला हवे. दिशाहीन होत चाललोय का, याचा विचार करायला हवा. मला आधार देण्याचे काम सुरेश धोत्रे यांनी केले. जागेबद्दल चिंता करू नका. वडार समाजासाठी जागा मिळवून देऊ.
सुरेश धोत्रे म्हणाले, की कोल्हापूर येथे होणाऱ्या मेळाव्याची तयारी म्हणून हा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. वडार समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. विकास करायचा असेल तर वडार समाजातील यशस्वी लोकांचा आदर्श घ्यायला हवा. जानेवारीच्या मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित राहा. वडार समाजासाठी पिंपरी चिंचवडमध्ये एखादी वास्तू उभी राहावी. यासाठी महापालिकेने भूखंड द्यावा, अशी मागणीही धोत्रे यांनी केली.
हनुमंतराव भोसले म्हणाले, की आम्ही माणसं जोडण्याचे काम केले. काहीतरी करायची इच्छा असेल तर समाजाचे प्रश्न समजून घ्या, अडचणीत मदत करा. सामाजिक बांधिलकी जपा. संघटना मोठी करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे. अनेक संघटना एक व्हायला हव्यात.
मनोहर बंदपट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज कलगुटकी, दिलीप कुसाळकर, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय धोत्रे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सागर वर्से यांनी केले. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी, तर आभार प्रदीप पवार यांनी मानले.
वडार समाज गौरव पुरस्कारांचे वितरण :
समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर हनुमंतराव भोसले, अवर सचिव मंत्रालय (मुंबई) मनोहर बंदपट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मोरे यांचा ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group