चिंचवड (Pclive7.com):- रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन समाजातील उपेक्षित घटकाला प्रेमाची आणि आपुलकीची ऊब देणे हीच खरी सणांची सार्थकता असते, याचा प्रत्यय चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये आला. वंचित, भटके आणि विमुक्त समाजातील मुलांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा खरा आनंद फुलवण्याच्या उदात्त भावनेतून ‘तत्वम सोशल फाउंडेशन’च्या वतीने गुरुकुलममधील तब्बल 350 मुला-मुलींसोबत अनोखा रक्षाबंधन सोहळा आणि स्नेहभोजनाचा संवेदनशील उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

उपक्रमादरम्यान फाउंडेशनने नेलेल्या राख्यांनी वातावरण भावूक झाले होते. गुरुकुलममधील मुलींनी तेथील मुलांना मायेची राखी बांधली, तसेच उपस्थित फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनाही राखी बांधत अनोखा जिव्हाळा जपला. रक्षाबंधन हा केवळ रूढी परंपरेतील सण नसून समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती वाटणारी माणुसकी, आदर आणि सामाजिक बांधिलकीची ती एक प्रतिज्ञा आहे, ही भावना यावेळी अधोरेखित झाली.
याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवक पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी अशा आत्मीय उपक्रमांची नितांत गरज आहे. विशेषतः तत्वम फाउंडेशनच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण वर्ग एकत्र येऊन सामाजिक जबाबदारीचे भान जपत असल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले, तसेच हे सेवाकार्य अविरत सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर म्हणाले की, सणांचा खरा आनंद हा समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच असतो. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमच्या सामाजिक कार्याची खरी ताकद असून, त्यांच्याशी जोडलेली ही नात्यांची आणि विश्वासाची वीण अधिक घट्ट करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न राहील.
या भावूक सोहळ्यानंतर सर्व 350 मुलांसाठी अत्यंत प्रेमाने आणि तृप्तीने भरवलेल्या स्नेहभोजनाने (अन्नदान) मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलवले. या हृदयस्पर्शी उपक्रमासाठी तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर, यांच्यासह सचिव वंदना चौहान, खजिनदार मनीषा पिसाळ यांच्यासह सदस्य आयुष चौहान, संदीप पिसाळ, श्रीराम घाटूळ आणि रजनी मांडले आदींनी विशेष परिश्रम घेतले.





















Join Our Whatsapp Group