पिंपरी (Pclive7.com):- अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवकांना दूर ठेवण्यासाठी आणि शैक्षणिक परिसर अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘कौशल्य – Drug Free Campus’ या अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानांतर्गत परिमंडळ-३ स्तरावरील विशेष जनजागृती कार्यक्रम अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेज, दिघी येथे उत्साहात पार पडला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत असून, युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे, व्यसनापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच शैक्षणिक परिसर सुरक्षित आणि अमली पदार्थमुक्त करण्याचा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमास परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश जैन, उपकुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, मानसिक पुनर्वसन व मुक्ती केंद्र, भोसरी येथील डॉ. मोरे, एमआयडीसी भोसरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, तसेच परिमंडळ-३ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अँटी नार्कोटिक सेलचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमाला परिमंडळ-३च्या हद्दीतील विविध शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या अभियानाचे विशेष आकर्षण ठरला.
अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगितले..
यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणामांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनामुळे केवळ संबंधित व्यक्तीचे आरोग्यच धोक्यात येत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होतो, याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. विशेषतः युवकांनी मित्रपरिवार, सामाजिक माध्यमे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या अमली पदार्थांच्या प्रलोभनांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या व्यसनाची सुरुवात लहान वाटत असली तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी जागरूक होऊन मदत घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

अमली पदार्थमुक्त कॅम्पससाठी सामूहिक जबाबदारी..
शाळा आणि महाविद्यालये ही विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे अमली पदार्थमुक्त शैक्षणिक परिसर निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन, शिक्षणसंस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः अमली पदार्थांपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्रांनाही या व्यसनाच्या विळख्यात अडकण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन करण्यात आले. संशयास्पद हालचाली किंवा अमली पदार्थांशी संबंधित माहिती आढळल्यास ती तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
अँटी नार्कोटिक सेलच्या हेल्पलाईनची प्रसिद्धी..
कार्यक्रमादरम्यान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अँटी नार्कोटिक सेलच्या 7798100112 या हेल्पलाईन क्रमांकाची विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्यांमध्ये व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती, संशयास्पद बाब अथवा अवैध व्यवहाराची माहिती असल्यास नागरिकांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद..
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण झाली. ‘कौशल्य – Drug Free Campus’ या अभियानाच्या माध्यमातून युवकांमध्ये अमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृती करून सुरक्षित, निरोगी आणि व्यसनमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. युवकांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करून समाजालाही अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.





















Join Our Whatsapp Group