पिंपळे सौदागर (Pclive7.com):- देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलातील अधिकारी व जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने औंध मिलिटरी स्टेशन येथे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी उपक्रम आयोजित करण्यात आला. उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी संरक्षण दलातील अधिकारी व जवानांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले.

सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना समाजातील भगिनींच्या प्रेमाची आणि आपुलकीची जाणीव व्हावी, तसेच त्यांच्या त्यागाला आणि राष्ट्रसेवेला सन्मानाची मानवंदना मिळावी, या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण मानला जातो. मात्र देशाच्या रक्षणासाठी सीमेवर, लष्करी तळांवर तसेच देशाच्या विविध भागांत कार्यरत असलेले जवान अनेकदा आपल्या कुटुंबीयांपासून दूर असतात. अशा जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी भगिनींच्या प्रेमाची आणि स्नेहाची अनुभूती मिळावी, या भावनेतून उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी जवानांना राखी बांधली. यावेळी वातावरणात आपुलकी, स्नेह आणि राष्ट्रभक्तीचा भाव दिसून आला.

या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते. मात्र आपल्या देशाचे रक्षण करणारे जवान हेही कोणाचे तरी भाऊ, मुलगे आणि कुटुंबातील सदस्य आहेत. देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ते आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या मनगटावर राखी बांधणे, ही आमच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे.
गेल्या पाच वर्षांपासून उन्नती सोशल फाउंडेशन आणि उन्नती सखी मंचच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबवित आहोत. समाज आणि संरक्षण दलातील जवान यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ व्हावे, जवानांच्या त्यागाबद्दल समाजात आदराची भावना निर्माण व्हावी आणि आपल्या वीर जवानांना ‘देश तुमच्यासोबत आहे’ हा विश्वास मिळावा, हीच या उपक्रमामागची भूमिका आहे. या छोट्याशा उपक्रमातून जवानांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि आनंद हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.”
यावेळी सुभेदार नवीन कुमार साहेब यांनी उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंचच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, “जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा हा उपक्रम अत्यंत भावनिक आणि आपुलकीचा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांच्या मनगटावर समाजातील भगिनी राखी बांधतात, ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. गेल्या पाच वर्षांपासून उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे.
देशसेवा करताना समाजाकडून मिळणारे प्रेम, सन्मान आणि आपुलकी जवानांसाठी मोठी प्रेरणा असते. उन्नती सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. अशा उपक्रमांमुळे जवान आणि समाज यांच्यातील नाते अधिक घट्ट होते.”
यावेळी नगरसेविका तथा उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे, उन्नती सखी मंचच्या सर्व महिला सदस्या सुभेदार नवीन कुमार साहेब, निवृत्त सुभेदार मेजर संतोष पुरण वानखडे, सुभेदार मोहम्मद असद इकबाल, सुभेदार मेजर विनोद चव्हाण, हवालदार महेश प्रताप पात्र, हवालदार राजकुमार तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group