पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात लोकमान्य हॉस्पिटलजवळ असलेल्या एका चेंबरमध्ये अडकून दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल शिंदे (वय 23) आणि मनोज शिंदे (वय 19) अशी मृत कामगारांची नावे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास हे दोघे कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य राबवत दोघांनाही बाहेर काढून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोणत्याही प्रकारची पुरेशी सुरक्षा व्यवस्था न करता कामगारांना धोकादायक चेंबरमध्ये उतरवण्यात आले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2025 रोजी याच बीएसएनएल चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरच्या कामादरम्यान दत्ता होलारे, लखन धावरे आणि साहेबराव गिरसेप या तीन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतरही आवश्यक सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एकाच ठिकाणी पुन्हा अशा प्रकारची जीवघेणी दुर्घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित कंपनी आणि बेजबाबदार ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई करावी तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






















Join Our Whatsapp Group