पिंपरी (Pclive7.com):- हुंडाबळीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकड येथील एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शिल्पा सचिन गवारे (वय ४२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रक्षाबंधन सणाच्या आदल्या ही दुर्दैवी घटना घडल्याने माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा गवारे यांचा विवाह वाकड परिसरातील उच्चभ्रू गवारे कुटुंबात झाला होता. लग्न झाल्यानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून शिल्पा यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. तुझ्या माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये तुझा हिस्सा मागून घे, असा तगादा पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यामागे लावला होता. माहेरून संपत्ती आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. यावरून तिला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.

सततचा छळ आणि मारहाणीला कंटाळून अखेर शिल्पा यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर मयत शिल्पा यांचा भाऊ उद्योजक संतोष कलाटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कलाटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती सचिन गवारे, सासरे आणि दीर यांच्याविरोधात हुंडाबळी तसेच कौटुंबिक छळवणुकीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेमुळे हळहळ
भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनच्या अवघ्या एक दिवसाअगोदरच शिल्पाने आयुष्य संपवल्यामुळे तिच्या भावाला आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ज्या हाताने भावाला राखी बांधायची होती, त्याच हातांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात अत्यंत दुःखाचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाइकांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group