मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. तालुक्यातील धरणग्रस्त, पुनर्वसित गावे तसेच नदीकाठच्या परिसरातील विकासकामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

पवना धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावांमध्ये आवश्यक पायाभूत व भौतिक विकासकामे तातडीने पूर्ण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच शिरे व शेटेवाडी येथील पुनर्वसनाशी संबंधित सुधारणांबाबत वेगाने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. पवना व आंद्रा धरण परिसरात आवश्यक त्या ठिकाणी बुडीत बंधारे उभारण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

इंद्रायणी व पवना नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुराच्या धोक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पूर संरक्षण भिंती उभारण्याची आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली. पुनर्वसित गावांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा दर्जेदार आणि टिकाऊ असाव्यात, तसेच विकासकामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मावळ तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली कामे केवळ मंजूर होणे पुरेसे नसून ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे, यावर आमदार शेळके यांनी बैठकीत भर दिला. प्रत्येक विकासकामाचा बारकाईने आढावा घेत त्यातील अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
धरणग्रस्त आणि पुनर्वसित नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळाव्यात, नदीकाठच्या गावांचे पूरस्थितीपासून संरक्षण व्हावे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावावा यासाठी आमदार सुनील शेळके यांचा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
मावळच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर होणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि नागरिकांच्या हिताची ठरावीत, यासाठी यापुढेही बारकाईने लक्ष देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.




















Join Our Whatsapp Group