मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील विविध विकासकामे तसेच प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासमवेत सोमवारी (दि.२४ ऑगस्ट) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मावळ तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण व घरकुल विभागातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या कामांना सुधारित प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली. तसेच पाणीपुरवठा योजनांच्या उर्वरित निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामांना प्रत्यक्ष गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मावळातील मराठी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून जास्तीत जास्त शाळांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही चर्चा झाली.

सामान्य कुटुंबातील नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी सुरू असलेल्या घरकुलांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. घरकुलांसाठी आवश्यक गायरान जागा उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात मावळ तालुक्यातील १७ आरोग्य उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर तालुक्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे निर्मितीबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
बांधकाम विभागांतर्गत मंजूर असलेल्या विविध कामांचा आढावा घेताना मावळातील ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. गावागावातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत प्रलंबित कामांना गती देण्यासंदर्भातही चर्चा झाली. स्थानिक नागरिकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार कॅम्प आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
कृषी विभागाच्या आढाव्यात तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित योजनांचे लक्षांक वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करतानाच जोवण, चावसर, आढले, बेबडओहोळ आणि गहुंजे येथे अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नवीन इमारती उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
याशिवाय मावळ तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रे, शाळा, स्मशानभूमी यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची तसेच तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना देण्याची मागणी करण्यात आली.
मावळच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विभागांतील कामांचा एकत्रित आढावा घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
मावळ तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देऊन संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी दिले. त्यामुळे मावळातील विविध विकासकामांना आगामी काळात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, बांधकाम सभापती सौ. दीपालीताई हुलावळे, पंचायत समिती सभापती सौ. सुनीताताई येवले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group