पिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो लाईन क्रमांक ३ अंतर्गत वाकड परिसरात प्रस्तावित असलेल्या मेट्रो स्थानकास “भुजबळ चौक मेट्रो स्टेशन” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी (भा.प्र.से.) यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वाकड परिसरातील भुजबळ चौक हे स्थानिक ओळख, सामाजिक संदर्भ आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे प्रस्तावित मेट्रो स्थानकाला “भुजबळ चौक मेट्रो स्टेशन” असे नाव दिल्यास परिसराची ओळख अधिक ठळक होण्यास मदत होईल. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी वाकड परिसरातील प्रस्तावित विकास आराखडा (डी.पी.) रस्ते व शिवरस्त्यांच्या विकासकामांना गती देणे, वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे तसेच नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणीही करण्यात आली.
वाकड परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्थानिक विकास आणि नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रशासनाच्या समन्वयाने सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष राम वाकडकर, नगरसेविका श्रुती वाकडकर, नगरसेविका रेश्मा भुजबळ, नगरसेवक कुणाल वाव्हळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चौधरी उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group