
पिंपरी (Pclive7.com):- यमुनानगर येथील सदगुरु गार्डनमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) NCMC स्मार्ट कार्ड विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमनताई पवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन नगरसेविका तथा शिवसेना उपनेत्या (महाराष्ट्र राज्य) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी युवानेते अजिंक्यदादा उबाळे, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि.२४ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांवरील) यांना एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील) यांना मोफत प्रवास, तसेच १२ वर्षांवरील महिलांना ५० टक्के सवलतीचा लाभ मिळण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड तयार करून देण्यात येत आहे.

फक्त १५० रुपये कार्ड शुल्क भरून हे स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी आहे. प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी तब्बल १८० नागरिकांनी नोंदणी केली असून त्यापैकी १२० नागरिकांची NCMC स्मार्ट कार्डे तयार करण्यात आली आहेत. नागरिकांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.



















Join Our Whatsapp Group