पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे येथील स्मशानभूमीत आधुनिक गॅस किंवा विद्युत दाहिनी (चिमणी) बसविण्यात यावी, अशी मागणी युवासेना चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उपशहरप्रमुख सागर शिंदे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पुनावळे गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. मात्र, येथे आधुनिक दाहिनीची सुविधा उपलब्ध नसल्याने पारंपरिक पद्धतीने लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत असून परिसरातील नागरिकांना तसेच स्मशानभूमीलगतच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना धुराचा आणि उग्र वासाचा त्रास सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पर्यावरणपूरक आणि आधुनिक दाहिनीची गरज निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुनावळे स्मशानभूमीत तातडीने आधुनिक चिमणी बसविण्यासाठी खासदार निधीतून अथवा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सौ. सुलभाताई उबाळे उपस्थित होत्या. निवेदन सादर करताना परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला.






















Join Our Whatsapp Group