पिंपरी (Pclive7.com):- वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये शिल्पा गवारे यांच्या मृत्यूच्या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिल्पा यांच्या मृत्यूला सासरच्या मंडळींचा छळ आणि हुंड्याची मागणी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

शिल्पा गवारे या भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद होत्या. रक्षाबंधनाच्या दिवशी स्नेहा कलाटे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून शिल्पाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. वाकड परिसरात अल्पावधीत अशा दोन घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला आळा घालण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, असे आश्वासन दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
कुटुंबीयांच्या आरोपानुसार, शिल्पा यांचा पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांच्याकडून दीर्घकाळ मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. दोन एकर जमीन, व्यवसायासाठी आर्थिक मदत तसेच वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देऊनही सासरच्या मंडळींचा पैशांचा हव्यास कमी झाला नाही, असा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुलगी सुखी राहावी या अपेक्षेने कलाटे कुटुंबीयांनी शक्य ती मदत केली. मात्र, छळ सुरूच राहिल्याने शिल्पाच्या आई-वडिलांनी आणि भावांनी तिला माहेरी परतण्याची विनंती केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कुटुंबाचा विचार करून शिल्पा सासरीच राहिली; मात्र अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिल्पाचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोपही माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीसह सासू, सासरे आणि दीर यांना अटक केली आहे.
शिल्पा गवारे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी तिच्या बेडरूमचे दार उघडे होते आणि ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्या वेळी पती सचिन घरात असतानाही तो बेडरूममध्ये का नव्हता, यासह विविध बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यातील बाबी आणि तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे हत्येच्या शक्यतेचाही तपास केला जात आहे. विशेष म्हणजे, शिल्पाच्या पतीविरुद्ध लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
आरोपींना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
शिल्पा गवारे प्रकरणात पती सचिन, सासू संजीवनी, सासरे उत्तम आणि दीर संदीप यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून, शिल्पाच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची सत्यता तपासली जात आहे.





















Join Our Whatsapp Group