पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील कृष्णानगर चौक परिसरातील ‘कोमल वाईन्स’मुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, कोमल वाईन्स परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, गोंधळ आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे जाधव यांनी नमूद केले आहे.
कृष्णानगर, कोयना नगर, शरद नगर, घरकुल, महात्मा फुले नगर आणि शिवाजी पार्क हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचाचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे, कोयना नगर कृती समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र गुरव तसेच इंगवले काका उपस्थित होते.

कोमल वाईन्स परिसराची प्रशासनाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच परिसरातील पोलीस गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि सार्वजनिक शांततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी,” असे मारुती गणपत जाधव यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group