मोशीतील १५ हेक्टर जागेवर कौशल्य विकास केंद्राची उभारणी; पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या तीन तपांच्या अखंड समाजसाधनेला सरकारचे भक्कम बळ
पिंपरी (Pclive7.com):- वंचित आदिवासी, भटके-विमुक्त आणि मागास समाजातील मुलांसाठी शिक्षण, संस्कार, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाचे नवे सर्वांगीण विकास केंद्र महाराष्ट्रात खुले होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मोशी येथे हे विकास केंद्र उभारण्याचा मार्ग राज्य सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे मोकळा झाला आहे, अशी माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी बुधवारी दिली.

राज्य सरकारने मोशी येथील १५ हेक्टर अर्थात सुमारे ३७ एकर शासकीय जमीन क्रांतिवीर चापेकर समिती संचालित क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या महसूल विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत शासन ज्ञापन जारी केले आहे. महाराष्ट्रातील मागास आणि वंचित आदिवासी समाजासाठी या जागेवर सर्वांगीण विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील मौजे मोशी, ता. हवेली येथील गट क्रमांक ३२७ (जुना सर्व्हे क्रमांक ३२५) मधील १५ हेक्टर जमीन संबंधित संस्थेला देण्यात येणार आहे. संस्था ही जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणून धारण करणार आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वंचित आदिवासी तसेच भटक्या-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाaठी सुरक्षित आणि संस्कारक्षम वातावरणात दर्जेदार शिक्षण घेण्याची व्यापक संधी निर्माण होणार आहे. औपचारिक शिक्षणासोबतच पारंपरिक ज्ञान, कला आणि कौशल्यांचे संवर्धन करून त्यांना आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाची जोड देण्याचा अभिनव प्रयोग या केंद्रातून केला जाणार आहे.
क्रांतिवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम यांच्या माध्यमातून प्रस्तावित जागेवर शिक्षण, निवासी प्रशिक्षण, संस्कार, संशोधन, पारंपरिक ज्ञान, आधुनिक कौशल्ये आणि सामाजिक विकास यांची सांगड घालणारे सर्वसमावेशक केंद्र विकसित करण्यात येणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबन निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक व कौशल्याधारित उपक्रम राबविणे शक्य होणार आहे. आदिवासी आणि भटक्या-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना या प्रकल्पामुळे मोठे बळ मिळणार आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोहोचवून सामाजिक पुनरुत्थान घडविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
मोशीतील १५ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजे पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या तीन तपांच्या अखंड समाजसाधनेचा गौरव आहे. त्यांच्या कार्याचा विस्तार करून महाराष्ट्रातील अधिकाधिक वंचित विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण आणि स्वावलंबनाच्या संधी पोहोचविण्यासाठी सरकारने या निर्णयातून भक्कम पाठबळ दिले आहे असे आमदार जगताप म्हणाले
तीन तपांच्या समाजसाधनेचा गौरव
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आदिवासी, भटके-विमुक्त आणि वंचित समाजाच्या पुनरुत्थानासाठी तीन तपे अखंड समाजसाधना केली आहे. या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतानाच त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचे, कला-कौशल्यांचे आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याचा अभिनव शैक्षणिक प्रयोग त्यांनी उभा केला.गुरुकुलमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला आणि पारंपरिक कौशल्यांना आधुनिक शिक्षणाची जोड दिली जाते. सामाजिक समरसता, संस्कार आणि स्वावलंबन यांवर आधारित या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो.
“मोशीतील १५ हेक्टर जमीन पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला जागा देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सामाजिक विकासातील ऐतिहासिक टप्पा आहे. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी वंचित आदिवासी आणि भटक्या-विमुक्त समाजातील मुलांच्या विकासासाठी केलेल्या तीन तपांच्या अखंड समाजसाधनेला राज्य सरकारने या निर्णयातून भक्कम बळ दिले आहे. आपल्या सरकारची विकासाची भूमिका केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यापुरती मर्यादित नाही. समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षण, संस्कार, कौशल्य आणि स्वावलंबनाची संधी देऊन सामाजिक पुनरुत्थान घडविणे, हीच आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या संकल्पनेला पुढे नेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्राला सामाजिक समरसता आणि मानवी विकासाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळेल.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ
“आदिवासी, वंचित आणि भटक्या-विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्यातील पारंपरिक ज्ञान, कला आणि कौशल्यांचे जतन झाले पाहिजे, या ध्येयातून माझी समाजसाधना सुरू आहे. गेली तीन तपे अनेक सहकारी, कार्यकर्ते आणि संवेदनशील नागरिकांच्या सहकार्याने ही वाटचाल अखंडपणे सुरू आहे. मोशीतील १५ हेक्टर जागा उपलब्ध झाल्यामुळे या कार्याचा विस्तार करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. येथे शिक्षण, संस्कार, कौशल्य, संशोधन आणि स्वावलंबन यांची सांगड घालणारे सर्वांगीण विकास केंद्र उभारण्याचा आमचा संकल्प आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार.”
– पद्मश्री गिरीश प्रभुणे, संस्थापक, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम





















Join Our Whatsapp Group