पिंपरी (Pclive7.com):- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सुरक्षित आणि सुकर विसर्जनासाठी रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो मंदिराशेजारील विसर्जन घाटासह परिसरातील विविध विसर्जन घाटांची विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य, विद्युत आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घाट परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला. विसर्जन घाट परिसरातील साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नाना काटे यांनी संबंधित विभागांना दिल्या.
तसेच घाट परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी लाईट, फ्लड लाईट्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विद्युत खांबांची तपासणी करणे आणि विद्युत यंत्रणा सुरळीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. घाटांची दुरुस्ती, डागडुजी आणि रंगरंगोटीची कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

गणेश विसर्जनाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक घाटांवर उपस्थित राहतात. त्यामुळे स्वच्छता, सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था आणि मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यावर नाना काटे यांनी विशेष भर दिला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या पाहणी दौऱ्यात स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनील दांगडे, संजय बंडगर, कनिष्ठ अभियंता जाई जाधव, समृद्धी पाटील, आश्लेषा सानप, अमित पवार, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण, गणेश राजगे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता बाप्पुसाहेब रोकडे, वीज पर्यवेक्षक राहुल संभु, असिफ शेख तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सव काळात विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुकर आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यावर नाना काटे यांनी भर दिला.





















Join Our Whatsapp Group