पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अप्पू घर अम्युजमेंट पार्क प्रकल्पाला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आक्षेप नोंदवला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक केल्याशिवाय कोणतीही मुदतवाढ किंवा मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे.

शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील अप्पू घर हे अनेक वर्षांपासून नागरिकांचे आकर्षण असलेले पर्यटन व मनोरंजन केंद्र आहे. कोरोना काळात प्रकल्प बंद राहिल्यामुळे त्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव महापालिकेकडे विचाराधीन आहे. मात्र, मुदतवाढ देताना प्रकल्पात नेमके कोणते नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत, याची माहिती नागरिकांसमोर ठेवणे आवश्यक आहे.

प्रस्तावित प्रकल्पात कोणत्या प्रकारची खेळणी, साहसी उपक्रम, वॉटर पार्क सुविधा किंवा इतर मनोरंजनात्मक साधने उभारली जाणार आहेत, याबाबत स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच प्रकल्पाचे नियोजन करणारे सल्लागार कोण आहेत, सुरक्षा निकषांची अंमलबजावणी कशी होणार, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, कोणत्या नोंदणीकृत कंपन्यांची उत्पादने वापरली जाणार आणि आवश्यक शासकीय परवानग्यांचे नियोजन काय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
या सर्व बाबींचे सादरीकरण शहरातील प्रमुख नेते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांसमोर करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच मनोरंजन प्रकल्पांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आर्किटेक्ट, डिझायनर आणि अनुभवी संस्थांच्या अधिकृत सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पाची संपूर्ण अधिकृत माहिती उपलब्ध होईपर्यंत अप्पू घर अम्युजमेंट पार्कला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देऊ नये आणि सर्व बाबींची खातरजमा झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group