पिंपरी (Pclive7.com):- “महिलांनी आपल्या ज्ञानाच्या, कलेच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत पुढे येणे ही प्रगत समाजाची ओळख आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या कल्पना क्षीरसागर यांनी शिक्षणापासून संगीतापर्यंत आणि कलेपासून सामाजिक कार्यापर्यंत विविध क्षेत्रांत केलेली वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे,अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून समाजातील प्रत्येक महिलेच्या प्रतिभेचा, आत्मविश्वासाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा सन्मान आहे “असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

ज्ञान, कला, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या कल्पना प्रकाश क्षीरसागर यांचा आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांतील त्यांचे उल्लेखनीय योगदान, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आणि सातत्यपूर्ण सामाजिक वाटचाल याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला,त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.

या सत्कारास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपाई नेते कुणाल वाव्हळकर, प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे,नगरसदस्य शत्रुघ्न काटे,शितल शिंदे,मधुरा शिंदे,सविता आसवानी यांच्यासह नगरसदस्य,नगरसदस्या तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
लेखन, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलाक्षेत्रांतही क्षीरसागर यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आपल्या कलागुणांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे व मुंबई आकाशवाणीवरही त्यांच्या कार्यक्रमांचे प्रसारण झाले आहे. ज्ञान, शिक्षण, संगीत आणि कलेच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधत त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मातृशक्तीच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत क्षीरसागर यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा “वुमन ऑफ द वर्ड” हा सन्मान प्राप्त झाला आहे. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कारांनी गौरविले आहे. विविध स्तरांवर मिळालेला हा सन्मान त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“पिंपरी-चिंचवड हे कष्टकरी, उद्यमशील आणि गुणवंत नागरिकांचे शहर आहे. शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी महानगरपालिका नेहमीच सकारात्मकतेने उभी राहील. त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असेही महापौर लांडगे म्हणाले. मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.





















Join Our Whatsapp Group