अभिनेत्री निधी अग्रवाल, गिरिजा प्रभू, प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या उपस्थितीत होणार भव्य दहीहंडी उत्सव
पिंपरी (Pclive7.com):- श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाकड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राम वाकडकर युथ सोशल फाऊंडेशनच्या भव्य दहीहंडी उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या उत्सवात १० लाख रुपयांच्या बक्षिसाची दहीहंडी ठेवण्यात आली असून, सर्वच गोविंदा पथकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवार दि. ०५ सप्टेंबर रोजी सायं. ४ ते रात्री १० वाजेपर्यंत वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, भारत माता चौकात या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निधी अग्रवाल आणि गिरिजा प्रभू यांची विशेष उपस्थिती. तसेच प्रेक्षकांचे लाडके विनोदी कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने उत्सवाची रंगत आणखी वाढणार असल्याची माहिती आयोजक भाजपा उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर व नगरसेविका श्रुतीताई वाकडकर यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन राम वाकडकर युथ सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन आणि गोविंदा पथकांच्या थरारक मानवी मनोऱ्यांचे सादरीकरण यावेळी पाहायला मिळणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने वाकड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हजारो नागरिक या भव्य सोहळ्यास उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयोजकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व व्यवस्था केल्याची माहिती दिली आहे.





















Join Our Whatsapp Group