पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह वैधानिक बैठकींचे बंद करण्यात आलेले लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले असून, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने वाघेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने निर्णयाचा पुनर्विचार करत महासभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू केले.

महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि नागरिकांना सभागृहातील चर्चा, निर्णय व लोकप्रतिनिधींची भूमिका थेट पाहता यावी, यासाठी लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा महत्त्वाची मानली जाते. मात्र, १५ जून २०२६ पासून ही सुविधा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या कामकाजापासून दूर ठेवले जात असल्याची टीका होत होती.
लाईव्ह प्रक्षेपण बंद झाल्यानंतर संदीप वाघेरे यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी स्वरूपात मागणी नोंदवली होती. महासभा आणि वैधानिक समित्यांच्या बैठकींचे थेट प्रक्षेपण पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली होती. तसेच मागणीची दखल न घेतल्यास न्यायालयीन मार्ग स्वीकारण्याचा इशाराही दिला होता.

यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने वाघेरे यांच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. तरीही प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महासभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना आता महापालिकेच्या सभागृहातील कामकाज प्रत्यक्ष पाहता येणार आहे. यामुळे निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांचा सहभागही अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी बैठकींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रसिद्धी करण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू होणे हा नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना संदीप वाघेरे म्हणाले, “महापालिका ही नागरिकांची संस्था आहे. सभागृहात कोणते निर्णय घेतले जातात, नागरिकांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी काय भूमिका मांडतात, हे जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आम्हाला कायदेशीर मार्ग स्वीकारावा लागला. अखेर प्रशासनाला निर्णय बदलून महासभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू करावे लागले. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या पारदर्शकतेच्या अधिकाराचा आहे.”
महापालिकेच्या महासभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू झाल्याने शहरात संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याची चर्चा रंगली असून, प्रशासनाच्या पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.





















Join Our Whatsapp Group