रावेत येथील ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७१५ समस्यांवर तात्काळ कार्यवाही
पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून जलदगतीने निराकरण करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रावेत येथील (दि.०३) समीर लॉन्समध्ये झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात आमदार जगताप यांनी ७१५ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नागरिकांच्या विविध समस्यांचा जागीच निपटारा करण्यात आला.

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमासाठी स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, तहसीलदार जयराज देशमुख, उपायुक्त राजेश आगळे, प्रदीप ठेंगल, नायब तहसीलदार रवींद्र कुलकर्णी, अन्नधान्य वितरण अधिकारी (परिमंडळ अ) डॉ. विजयकुमार क्षीरसागर, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार रवींद्र कुलकर्णी, ‘ज ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, मनपा कार्यकारी अभियंता सुनील पवार, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, संध्या वाघ, ‘महावितरणचे सहाय्यक अभियंता रत्नदीप काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहाय्यक निवडणूक अधिकारी वैशाली शिंदे, रावेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लिंभोरे, राहुल सोनवणे, अमोल कोरडे, याशिवाय शहर भाजप पदाधिकारी दीपक भोंडवे, रावेत वाल्हेकरवाडी मंडलाध्यक्ष मोहन राऊत, श्रीकांत भोंडवे, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, सोमनाथ भोंडवे आदी उपस्थित होत्या.

आमदार आपल्या दारी उपक्रमातून आमदार शंकर जगताप यांनी अतिक्रमण मुक्त रावेतचा निर्धार करताना पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची सूचना केली. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळे ठरणारे सर्व खाजगी व महानगरपालिकेच्या जागेवरील आठवडे बाजार यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. विकासनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा, सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्याची मागणी करण्यात आली. किवळे येथे ज्येष्ठांसाठी उद्यान विकसित करण्यात यावे. येथील सेवा रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे अशी देखील मागणी करण्यात आली. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत नागरिकांनी तक्रार केली. स्ट्रीट लाईट सुरु करण्यात याव्या. डीपीमधील रस्ते विकसित करणे, एमएससीबीचे प्रलंबित प्रश्न, घंटागाडी नियमित येणे, पाणीपुरवठा वेळेत सुरू ठेवावा अशी मागणी नागरिकांनी केली. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या जड वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी सोसायटी धारकांनी केली. तसेच कचरा संकलन केंद्राबद्दलही नागरिकांचे प्रश्न होते नागरिकांनी यावेळी थेट आमदारांशी संवाद साधला.
या उपक्रमात नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वीजपुरवठा, वाहतूक, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, संजय गांधी निराधार योजना , रेशनकार्ड आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न मांडले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या निवेदनांची नोंद घेतली. तत्काळ सोडवता येणाऱ्या प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर तांत्रिक किंवा प्रशासकीय प्रक्रिया आवश्यक असलेल्या प्रकरणांचा कालबद्ध पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी दिले.
एकाच छताखाली नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण
आमदार आणि प्रशासनातील अधिकारी थेट नागरिकांसमोर उपलब्ध झाल्याने नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत फेऱ्या मारण्याऐवजी एकाच ठिकाणी आपल्या समस्या मांडता आल्या. प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागाकडे जबाबदारी निश्चित करण्यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. आजच्या या उपक्रमात आरोग्य, पाणीपुरवठा, स्थापत्य, उद्यान, कर संकलन, नगररचना, बांधकाम परवानगी, विद्युत तसेच पर्यावरण विभागाचे दालन उभारण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांच्या समोर आपल्या तक्रारी मांडल्या. तसेच शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून तहसील विभाग, रेशनकार्ड, तलाठी, एमएनजीएल, एमएसईबी, तसेच एनएचएआय विभाग देखील नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी उपस्थित होते.
“नागरिकांनी आपल्या प्रश्नांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवू नयेत, यासाठी थेट नागरिकांपर्यंत जाण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आज याच माध्यमातून रावेत, किवळे आणि मामुर्डीकरांच्या समस्या जाणून घेतल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे. आमदार आपल्या दारी या उपक्रमातून स्थानिक पातळीवरील प्रश्नांसोबतच शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांवरही संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ठोस आणि कालबद्ध कार्यवाही केली जाईल. नागरिकांचा प्रत्येक प्रश्न हा माझ्यासाठी प्राधान्याचा विषय असून, त्याचा निरंतर पाठपुरावा केला जाईल.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ




















Join Our Whatsapp Group