पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरा व असमान पाणीपुरवठा, बीआरटी मार्गांची झालेली दुरवस्था, पवना नदीचे प्रदूषण आणि अनधिकृत बांधकामांमुळे रखडलेले रस्ते यांसारख्या विविध गंभीर नागरी समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

शहरातील विविध प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी गुरुवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. त्यांनी शहराच्या विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेवक निलेश तरस, ऐश्वर्या तरस, राजेंद्र तरस, बापू कातळे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, उपायुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, शहरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त आहेत. अतिक्रमणे, अनधिकृत विक्रेते आणि बेशिस्त पार्किंगमुळे ट्रॅफिक जामची समस्या गंभीर बनली आहे. तासनतास लोकांना एकाच चौकात अडकून राहावे लागते. यासंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन ज्या चौकांत सर्वाधिक कोंडी होते, तिथे तातडीने सूक्ष्म नियोजन करावे. पोलीस व पालिकेने परस्पर समन्वय साधून नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी. संध्याकाळच्या वेळी शहरात येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेससाठी शहराबाहेर वेगळी पार्किंग व्यवस्था करावी, जेणेकरून मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. यासाठी ट्रॅव्हल्स/बस संघटनांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
स्मार्ट सिटीच्या ‘सीसीटीव्ही’चे थर्ड पार्टी ऑडिट करा..
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात किती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्यातील प्रत्यक्ष किती चालू आहेत, याचा ठोस हिशोब प्रशासनाकडे नाही. या कामाची सखोल तपासणी करून तातडीने ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करावे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यरत राहतील याची दक्षता घेण्याचे आदेश बारणे यांनी दिले.
पीएमआरडीए अन् रिंगरोड नियोजन
आऊटर रिंगरोडच्या कामाच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए आयुक्त व पालिका प्रशासनाने संयुक्त बैठक घ्यावी. शहराच्या लगतच्या सीमांवर बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस टर्मिनल्ससाठी जागा उपलब्ध करून ठेवावी, जेणेकरून शहरांतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असेही बारणे यांनी स्पष्ट केले.
बीआरटीची दुरवस्था अन् खड्ड्यांचे साम्राज्य
बीआरटी मार्गांची दुरवस्था झाली आहे. बीआरटी लेनमध्ये कचरा साचला असून बॅरिकेट्स तुटलेले आहेत. गवत उगवून बीआरटीचे विद्रूपीकरण झाले आहे, ते तातडीने स्वच्छ करून घ्यावे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे अजूनही न बुजवल्याने रोज अपघात होत आहेत; हे खड्डे त्वरित बुजवावेत. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी फिरते पथक तैनात करावे, असे आदेशही त्यांनी दिले.
नागरिकांना शुद्ध व समान दाबाने पाणी द्या..
नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, त्यातही असमानता आहे. नागरिकांना शुद्ध व समान दाबाने पाणी मिळालेच पाहिजे. पाणी वाटपाचे वेळापत्रक निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. पवना नदीत रासायनिक व घाण सांडपाणी सोडल्यामुळे प्रदूषण वाढले आहे. प्रभागाधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी सोपवून घाण पाणी सोडणाऱ्या घटकांवर व उद्योगांवर थेट गुन्हे दाखल करा. येत्या दोन महिन्यांचे टार्गेट ठेवून नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलावेत, असे निर्देशही खासदार बारणे यांनी दिले.
ॲमेनिटी स्पेसच्या भूखंडाची यादी जाहीर करा..
महापालिकेच्या ताब्यातील ॲमेनिटी स्पेसच्या (नागरी सुविधा भूखंड) जागांचा गैरवापर होत असून तिथे अवैध धंदे सुरू आहेत. पालिकेने अशा सर्व भूखंडांची यादी जाहीर करून रेकॉर्डवर आणावी. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तिथे नागरी सुविधा उभ्या कराव्यात. तसेच ज्या आरक्षित जागा ताब्यात आहेत, तिथे सीमाभिंत बांधून किमान खेळाची मैदाने विकसित करावीत.
याशिवाय कासारवाडी-फुगेवाडी परिसरातील अंडरपासचे काम, डीपी रस्त्यांचा ताबा घेणे आणि नव्याने विकसित झालेल्या रावेत, किवळे, पुनवळे या नव्याने विकसित होणाऱ्या भागांतील रस्ते, पाणी व विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश या बैठकीत खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.






















Join Our Whatsapp Group