चिखली (Pclive7.com):- कृष्णानगर व परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित नागरी समस्या आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची पुणे येथे भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान कृष्णानगर परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक व्यवस्था, ड्रेनेज, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक समस्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. परिसरातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
स्पाईन रोडवरील वाईन्स शॉपीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
बैठकीत स्पाईन रोड परिसरातील एका वाईन्स शॉपीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचा मुद्दाही मारुती जाधव यांनी उपस्थित केला. वाईन्स शॉपी परिसरात होणारी गर्दी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे महिलांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संबंधित प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन सुनेत्राताई पवार यांनी दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट देऊन गौरव..
यावेळी जगविख्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट देऊन सुनेत्राताई पवार यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक परिवर्तन, समता आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने केलेल्या प्रभावाची आठवण यावेळी करून देण्यात आली. नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे सांगितले. तसेच प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे मारुती जाधव यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मारुती जाधव म्हणाले, “नागरिकांच्या समस्या केवळ आश्वासनांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्षात सुटाव्यात, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने ठामपणे पाठपुरावा केला जाईल. विकासकामांसोबतच परिसरातील महिलांची सुरक्षितता हाही महत्त्वाचा विषय असून, त्यासाठीही सातत्याने आवाज उठवला जाईल.”






















Join Our Whatsapp Group