पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू असल्याची लेखी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे केली आहे. येत्या आठवडाभरात शहरातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास १ जुलै रोजी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आरपीआयच्या युवक आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निकाळजे यांनी दिला आहे.
सुरेश निकाळजे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्याची पोलखोल केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या पिंपरी पोलिस चौकीच्या हद्दीमध्ये बौद्धनगर पिंपरी कॅम्प बौद्ध विहारा शेजारी, नाणेकर चाळ, मिलिंदनगर मोठ्या मजिद शेजारी व डिलक्स माॅल जवळ मटका धंदा चालू आहे. वाकड पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या काळेवाडी पोलिस चौकीच्या हद्दीमध्ये एका महिलेचा मटका, सोरटचा अवैध धंदा सुरू आहे. सांगवी पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या पिंपळे सौदागर पोलिस चौकीच्या हद्दीमध्ये गणादिश सोसायटीजवळ, काटे पेट्रोल पंपासमोर मटका, सोरट, पत्त्याचा क्लब राजरोसपणे सुरू आहे. पोलीस आयुक्तांनी या तीनही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारे अवैध धंदे कायम स्वरूपी बंद करावेत. ह्या धंद्यामुळे गोरगरीब, झोपडपट्टीतील नागरीकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. या अवैध मटक्याच्या धंद्यामुळे शहरातील तरूण मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. या मटक्याच्या धंद्यामुळे नुकताच तरूणांच्या दोन गटात जोरदार मारामारी व खुनाचा प्रयत्न झाला आहे.
यापूर्वी अनेकदा तक्रारी होऊनही गेली कित्येक वर्षे राजरोसपणे हे अवैध धंदे चालु आहेत. पोलीस आयुक्तांनी या तीनही पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असणारे अवैध धंदे दि.२८ जून पर्यंत कायम स्वरूपी बंद करावेत. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाच्या पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडीच्या वतीने १ जुलै पासून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेश निकाळजे यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group