पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील कन्या शिवानी जाधव हिने देशपातळीवरील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘फेमिना मिस ग्रँड इंडिया’ हा पुरस्कार पटकविला आहे. रविवारी तिचे शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ यांनी तिचे सहर्ष स्वागत केले. तसेच महापौर राहुल जाधव यांनी देखील तिची भेट घेऊन अभिनंदन केले.

मुळची पिंपरी चिंचवड शहरातल्या प्राधिकरणातील रहिवासी असलेली शिवानी नोकरीनिमित्त छत्तीसगड येथील रायपूर येथे वास्तव्यास होती. यंदाच्या ‘मिस इंडिया’ स्पर्धेत तिने तिथूनच सहभाग घेतला होता. त्यात ती छत्तीसगड राज्याची विजेती ठरली. त्यामुळे तिला ‘मिस इंडिया’ स्पर्धेत उतरता आले. आणि या स्पर्धेत तिने ‘मिस इंडिया ग्रँड’चा किताब पटकावला. तसेच बॉडी ब्युटीफूल या किताबाची देखील ती मानकरी ठरली. प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधनी प्रशाळेतील माजी विद्यार्थिनी असलेल्या शिवानीने इंजिनिअरिंगची पदवी पुण्यातील एमआयटी घेतली. त्यानंतर ती नोकरीसाठी रायपूर येथे होती. पूर्वी कॉलेजमध्ये असताना ती कॉलेज प्रिंसेस या किताबाचा मानकरी ठरली होती. त्यामुळे शिवानीने नंतर ‘मिस दिवा’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला. होता तिथे तिने दहावा क्रमांक पटकावला होता. त्या स्पर्धेनंतर शिवानीला या स्पर्धेची आवड निर्माण झाली. म्हणून तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेसाठी तयारी करण्याचे ठरवले. त्यानुसार रायपूर मधून १३२ स्पर्धकांची निवड होऊन, ती कलकत्ता येथे दाखल झाली. तिथे ती फायनल राऊंडची विजेती झाली.
त्यानंतर मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम मध्ये १५ जून रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात अंतिम ३० स्पर्धकांमधून ‘मिस इंडिया ग्रँड’ या स्पर्धेची विजेती ठरली. आणि मिस छत्तीसगड स्पर्धेत पासून सुरू झालेल्या मागील सहा-सात महिन्यांच्या अथक परिश्रमाचे जणू चीज झाले. या स्पर्धेदरम्यान अनेक कसोटीचे क्षण आले. घरच्यांपासून तिला दूर रहावे लागले. खाण्यापिण्याचे निर्बंध पाळावे लागले. मित्र-मैत्रिणींना भेटता आले नाही. पण या साऱ्या गोष्टी विसरायला लावणारा तो लखलखता मुकुट अखेर डोक्यावर चढला. आता शिवानीला यापुढील जागतिक स्पर्धेसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात वेनेझुईला जायचे आहे. या स्पर्धेसाठी आई-वडील तसेच सर्वच नातेवाईकांचे आशीर्वाद घेण्यासाठी ती रविवारी आपल्या प्राधिकरणातील घरी आली होती. त्यावेळी सर्वांनीच तिचे सहर्ष स्वागत केले.






















Join Our Whatsapp Group