इंदापुर (Pclive7.com):- इंदापुर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी गटाच्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी काल २३ जुन रोजी मतदान झाले होते. त्याचा निकाल आज हाती आला आहे.
या निवडणुकीसाठी रत्नप्रभादेवी पाटील यांच्या नात व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना राष्ट्रवादीचाही जाहीर पाठींबा होता. एकुण आठ उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत अंकिता व अपक्ष उमेदवार दिपाली कोकाटे यांच्यातच होती.
हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या अंकिता पाटील यांनी २० हजार ७३७ मते मिळवत अपक्ष उमेदवार कोकाटे यांचा तब्बल १७ हजार २७४ एवढ्या विक्रमी मताधिक्याने पराभव केला आहे. कोकाटे यांना ३ हजार ४६३ एवढी मते मिळाली.
अंकिता यांच्या रुपाने बावड्याच्या पाटील घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात आली आहे. त्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या संचालिका आहेत. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी मी काम करणार आहे. उच्च शिक्षित पिढीने राजकारणात सक्रियपणे पुढे आले पाहीजे, राजकारण हे जनतेच्या विकासकामांसाठी आवश्यक असणारे प्रभावी व्यासपिठ आहे, असे मत अंकिता पाटील यांनी व्यक्त केले आहे.






















Join Our Whatsapp Group