पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ८५ नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन कोरोना विरोधातील उपाययोजना आणि मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या ८५ नगरसेवकांचे मानधन पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे हे देखील आपले एक महिन्याचे मानधन भाजपच्या आपदा कोषमध्ये जमा करणार आहेत.
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या काळात कष्टकरी, निराधार नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी समाजाच्या सर्वच स्तरातून नागरिक पुढे येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ३८ नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ८५ नगरसेवकांनीही आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या ८५ नगरसेवकांच्या मानधनाचा एकत्रित रक्कमेचा धनादेश पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे दोन आमदारही आपले एक महिन्याचे मानधन कोरोना विरोधातील मदतीसाठी देणार आहेत. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे दोघेही मार्च महिन्याचे मानधन भाजप आपदा कोषात जमा करणार आहेत.






















Join Our Whatsapp Group