पिंपरी (Pclive7.com):- दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकज धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या २३ पैकी २ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण ‘कोरोनाग्रस्त’ झाले असून शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे. दरम्यान आता शहरात ४ पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहेत.
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये करोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल ३३ नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी २३ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना वायसीएम व भोसरी येथील नवीन रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच त्यांच्या ९ नातेवाईकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरामध्ये कोरोना विषाणूला रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले होते. मागील १२ दिवसांत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नव्हता.
मात्र आता दिल्लीवरून आलेले संशयित पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच त्यातील काहीजण अजूनही बेपत्ता आहे. त्यांना शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरु आहे. दरम्यान नियंत्रणात आणलेली परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याच्या भीतीने प्रशासनाची झोप उडाली आहे.






















Join Our Whatsapp Group