पिंपरी (Pclive7.com):- घराबाहेर जाणे शक्य नसलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना अन्न, औषधे व इतर सेवा सुविधांच्या सेेवेसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘सारथी हेल्पलाईन’चा मोबाईल क्रमांक 8888006666 कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. या साथ रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना विविध माध्यमांतून देण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावर आणि महापालिका स्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नियोजन करण्यात आलेले आहे. घराबाहेर जाणे शक्य नसलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना अन्न, औषधे व इतर सेवा सुविधांची आवश्यकता असल्यास, त्याकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘सारथी हेल्पलाईन’ मोबाईल क्रमांक 8888006666 संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
याकामी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने अन्न, औषधे व इतर अत्यावश्यक सेवा सुविधा अशा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या निवासस्थानी पोहचविण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. तरी, घराबाहेर जावू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांनी वरील नमूद केलेल्या सेवेचा लाभ घेणेकामी मनपा सारथी हेल्पलाईन मोबाईल क्रमांक 8888006666 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याकामी श्री.उल्हास जगताप, नगरसचिव तथा सहाय्यक आयुक्त, नागरवस्ती विकास योजना विभाग यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून, अधिक माहितीसाठी त्यांचा मोबाईल क्र.9922501255 व इमेल आय डी- [email protected] / [email protected] यावर संपर्क साधण्यात यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group