मुंबई (Pclive7.com):- अंबानी यांच्या घरा शेजारील स्फोटक प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या गृह विभागात मोठे बदल करण्यात आले आहेत. तत्कालीन पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तालयाचा पदभार दिला असून रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा पदभार दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त, रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार, संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी तर परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी दिली असल्याचे ट्विट मध्ये सांगितले आहे.
मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेमंत नगराळे, परमवीर सिंह यांच्यासोबत मिटिंग केली होती. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री साधारण आठ वाजता ही बैठक सुरु झाली. मध्यरात्री 12 च्या सुमारास ही बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
अंबानी स्फोटक प्रकरणात ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group