पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर व परिसरात ‘गो’तस्करांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाई व बैलांना भुलीची इंजेक्शने देऊन रात्रीच्या वेळी त्यांची बेकायदेशीर वाहतूक करून कत्तल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ एप्रिल रोजी भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील मैदानात अशा प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे फोटो व व्हिडिओ पुरावे प्रशासन व पोलीस यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारच्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. त्यावेळी पोलीस प्रशासनाने विशेष “गो स्क्वॉड” स्थापन करून कारवाई केली होती. मात्र, पुन्हा अशा टोळीचे सक्रिय होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या टोळीचा पाठलाग करताना गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याचीही माहिती आहे. आरोपींनी त्यांच्या वाहनाला धडक देत घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे टोळीची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि धाडस स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर मानद पशुकल्याण अधिकारी निलेश चासकर व अभिजीत चव्हाण यांनी प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींना अटक करावी, मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, तसेच शहरात पुन्हा विशेष “गो स्क्वॉड” स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, रात्रीच्या वेळी संशयास्पद वाहनांची तपासणी वाढवून अशा घटनांना आळा घालावा आणि गोरक्षकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलीसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group