पिंपरी (Pclive7.com):- “महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करणे हा या मातीचा अपमान आहे. ४ मे रोजी पुकारलेला रिक्षा चालकांचा संप हा पूर्णपणे फसलेला असेल. राज्यातील १५ लाख रिक्षा चालक संपावर जाणार असल्याची चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल केली जात आहे. महाराष्ट्रातील कोणतीही मोठी संघटना या संपात सामील नाही,” असा ठाम निर्धार कष्टकऱ्यांचे नेते व महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत या प्रमुख संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट करताना या संपाला कडाडून विरोध केला आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
१. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा संपाला नकार:
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि संभाजीनगरसह महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील रिक्षा चालक या संपात सहभागी होणार नाहीत. ही भूमिका संयुक्त कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र गायकवाड (नांदेड) यांनी जाहीर केली आहे.
२. मराठी भाषा ही आमची अस्मिता:
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या या भूमीत मराठीला महत्त्व देणे हे आमचे कर्तव्य आहे. ज्ञानेश्वर माउलींपासून तुकोबारायांपर्यंत सर्वांनी मराठीचा गौरव केला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळही मराठीच्या आधारावर झाली. असे असताना काही लोक परप्रांतीयांची बाजू घेऊन मराठीला विरोध करत आहेत, ही खेदाची बाब आहे.
३. रिक्षा चालक मराठी विरोधी नाहीत:
सोशल मीडियावर रिक्षा चालक मराठी विरोधी असल्याचे चित्र रंगवले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य रिक्षा चालक हे मराठी आहेत आणि ते आपल्या मातृभाषेचा सन्मानच करतात. काही मोजक्या व्यक्तींच्या स्वार्थासाठी संपूर्ण रिक्षा चालक समाजाला मराठी विरोधी ठरवणे चुकीचे आहे असे मत डॉ बाबा कांबळे यांनी व्यक्त केले .

४. बोगस ‘परमिट घोटाळ्या’चे धाबे दणाणले:
हा प्रश्न फक्त भाषेचा नाही, तर त्यामागे मोठा ‘परमिट घोटाळा’ दडलेला आहे. परप्रांतीयांनी बोगस जन्माचे दाखले आणि शाळाचे दाखले सादर करून हजारो रिक्षा परमिट लाटले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. मराठी भाषेची सक्ती झाल्यास या बोगस परमिटधारकांचे बिंग फुटणार आहे, म्हणूनच या निर्णयाला विरोध केला जात आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. बाबा कांबळे यांनी केली आहे.
५. माध्यमांना नम्र आवाहन:
“१५ लाख रिक्षा चालक संपावर जाणार ही बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सत्य परिस्थिती मांडली जावी,” असे आवाहन डॉ. बाबा कांबळे यांनी सर्व वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सना केले आहे.

“महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलीच पाहिजे. मराठीला विरोध करणाऱ्यांना आणि बोगस परमिट लाटणाऱ्यांना रिक्षा चालक धडा शिकवतील.”
– डॉ. बाबा कांबळे




















Join Our Whatsapp Group