पिंपरी (Pclive7.com):- मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला तब्बल २७ तास ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवत १२ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हाणून पाडला. वडिलांच्या प्रसंगावधानामुळे हा सायबर गुन्हा वेळीच उघडकीस आला.

निगडी परिसरातील एका तरुणाला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅप कॉल करून संपर्क साधला. “तुमच्या नावाच्या पार्सलमध्ये पासपोर्ट व एमडी ड्रग्ज आढळले आहेत,” अशी भीती दाखवत त्याला स्काईप कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. या दरम्यान आरोपींनी त्याच्याकडून बँक खात्याची माहिती तसेच आधारशी संबंधित तपशील मिळवले.

यानंतर प्रकरणातून सुटका करून देण्यासाठी ‘क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्याच्या नावाखाली १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी संबंधित तरुणाने म्युच्युअल फंड मोडून रक्कम जमा करण्याची तयारीही केली होती. मात्र, त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ संशय घेत पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून ही फसवणूक रोखली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या संशयास्पद कॉल्सना बळी पडू नये. कोणताही सरकारी विभाग किंवा पोलीस अधिकारी फोन, व्हिडिओ कॉल किंवा ऑनलाइन माध्यमातून पैसे मागत नाही. शंका आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाणे किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा.




















Join Our Whatsapp Group