पिंपरी (Pclive7.com):- महापालिका उद्यान विभागाची कोणतीही परवानगी नसताना ठेकेदाराने राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून पिंपरी संत तुकारामनगर येथील बॅडमिंटन हॉलच्या आवारातील तब्बल २५ मोठ्या झाडांची कत्तल केली. हा धक्कादायक प्रकार शिवसेनेने समोर आणला आहे.
पर्यावरणाची हानी करणाऱ्या या ठेकेदारासह संबंधित अधिकारी तसेच राजकीय पुढाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही देण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आणि महापालिका उद्यान अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, समन्वयक जितेंद्र ननावरे, अभिजीत गोफण, संजय यादव, भोलाराम पाटील, पुरुषोत्तम वाईकर, रामदास वानखेडे, दत्ताराम साळवी, विशाल चव्हाण आदीनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला.
दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी सरकारी सुटी असताना महापालिकेच्या ठेकेदाराने ३५ ते ५५ फूट उंच असलेल्या पाच मोठ्या झाडांची मुळापासून कत्तल केली. १०.३५ इंच व्यास असलेली मोठी झाडे १० फुटांपर्यंत कापली. यासंदर्भात ठेकेदाराकडे शिवसैनिकांनी जाब विचारला असता कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी नसल्याची कबुली ठेकेदाराने दिली.
राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून झाडांची बेकायदा कत्तल केल्याचे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले. या प्रकाराची माहिती महापालिका उद्यान अधीक्षक जी. आर. गोसावी यांना त्वरित देण्यात आली. त्यांनीही वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले.
शिवसैनिकांनी वृक्षतोडीला विरोध केल्यामुळे १० ते १५ झाडे वाचली. हा प्रकार उघड झाल्यावर तोडलेली झाडे एका ट्रकमधून गायब करण्यात आला. शिवसैनिकांनी वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराला संत तुकारानगर पोलीस चौकीत नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्याकडे या बेकायदा वृक्षतोडीबाबत तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
























Join Our Whatsapp Group