पिंपरी (Pclive7.com):- निगडी सेक्टर 22 येथील ड्रेनेज लाईन चोकअप होऊन दरवर्षी मोठ्या प्रमाणात मैलामिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहते. पालिका प्रशासनाच्या दुर्क्षपणामुळे येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्टॉर्म वॉटर लाईन चोकअपचा निर्माण होणारा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यात येणार आहे. त्यासाठी या ड्रेनेज लाईनचे काम नव्याने करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल 74 लाख रुपयांची निविदा राबविण्यात आली आहे, अशी माहिती प्रभागातील चारही नगरसेवकांनी दिली.
सेक्टर 22 येथील मुख्य रस्ता, आझाद चौक, संग्रामनगर झोपडपट्टी आणि श्रमिकनगर झोपडपट्टी याठिकाणी दरवर्षी स्टॉर्म वॉटर लाईन चोकअप होते. मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर वाहू लागल्यानंतर त्याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होतो. वेळोवेळी पालिका प्रशासनाला याबाबत माहिती कळवल्यानंतर देखील अधिकारी दुर्लक्ष करत आले आहेत. प्रभागातील चारही नगरसेवकांनी ड्रेनेज लाईनची समस्या मार्गी लावण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
नुकतीच ही स्टॉर्म वॉटर लाईन फुटल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आली. मैलामिश्रीत पाण्यापासून परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून यामुळे या भागात रोगराई पसरण्याची शक्यता नगरसेवकांनी आयुक्तांकडे व्यक्त केली होती. त्यावर आयुक्त पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन त्यावर कायमस्वरुप मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्टॉर्म वॉटर लाईनची समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांनी 74 लाख रुपयांची निविदा राबविली आहे. हे काम देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेला मिळाले आहे.
या कामांतर्गत या भागातील ड्रेनेज लाईन टाकणे, अंतर्गत रस्त्यातील लाईन्स दुरूस्त करणे यासह अन्य स्थापत्यविषयक कामांना महापालिकाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यासाठी नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे यांनी पाठपुरावा केला आहे.





















Join Our Whatsapp Group