पिंपरी (Pclive7.com):- भाजपने ‘ना भय ना भ्रष्टाचार’चे वचन देऊन महापालिकेची सत्ता मिळविली. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत भ्रष्टाचार आणि भय सुरू केले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लाचप्रकरणी एसीबीने धाड टाकत स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना महापालिकेतून अटक केली. यामध्ये काय तरी गूढ आहे. असे असताना भाजप आमदारांनी स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करणे लाजिरवाणे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
महापालिका स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी रंगेहाथ पकडले. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, विशाल वाकडकर, संदीप चिंचवडे उपस्थित होते.
महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्टाचारावरून शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हल्ला सुरु केला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
कालच्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिलेल्या सर्व विषयांना स्थगिती देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीने बेस्ट सिटी म्हणून शहराची ओळख देशात निर्माण केली. तर, भाजपने पाच वर्षात भ्रष्टाचारी शहर अशी ओळख दिली आहे.
– संजोग वाघेरे पाटील, शहराध्यक्ष
काही तरी गूढ असल्यामुळेच न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असेल. दोनही आमदार स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करतात हे लाजिरवाणे आहे. आमदारांना आता सांगायला काही राहिले नाही.
– राजू मिसाळ, विरोधी पक्षनेते
भाजपच्या पापाचा घडा भरला आहे. आमच्यावर मूर्ती खरेदीत काही नसताना खोटेनाटे आरोप केले. ते आरोपच राहिले. भाजपच्या राजवटीत महापालिकेत पोलिसांनी महापालिकेत येऊन कारवाई केली. लाच घेताना स्थायी समिती स्वीय सहाय्यक यांना पकडले आहे. या पेक्षा दुसरा पुरावा काय हवा..
– प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष





















Join Our Whatsapp Group