पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संघटनेचे बोधचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीनिमित्त त्यांचे कौतुक करून देशाच्या सुरक्षिततेसाठी जीवाची बाजी लावणारे अतिशय प्रमाणिक आयुक्त शहराला लाभले याचा आम्हाला गर्व असल्याचे भोसले याप्रसंगी म्हणाले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी, गुणवंत कामगार स्वानंद राजपाठक, युवा आघाडीचे अध्यक्ष दिनेश पाटील, दीपक पाटील, करण भालेकर, जयदेव अक्कलकोटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी यशवंतभाऊ भोसले म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २००८ साली एक अद्यादेश काढला आहे. त्याप्रमाणे महापालिकेत स्थानिक ८० टक्के भूमिपुत्रांना नोक-यांमध्ये प्राधान्य द्यावे. त्याची अंमलबजावणी करावी. महापालिकेत जवळपास ३ हजार ८०० च्या वर रिक्त जागा आहेत त्या भरल्या नाहीत. या रिक्त जागांवर स्थानिक भूमिपुत्रांना त्वरित नोकरी द्यावी.
तसेच कोरोना काळात मानधनावर काम करणा-या कामगारांना सेवेत कायम करावे. रोजगार टिकवण्यासाठी न्यायालयीन लढाई चालू ठेऊन कामगार काम करत आहेत. दरम्यान, आयुक्तांनी कंत्राटी ३५० कामगारांना पूर्ववत कामावर घेतले आहे. त्याबाबत त्यांचे आभार मानले. महापालिकेने रिक्त जागा भरण्याबाबत पावलं उचलले असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले आहे. आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले.
यशवंत भोसले म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षे पिंपरी-चिंचवड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उद्योग, व्यवसाय, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर परिणाम झाला होता. आता कोरोनाचे संकट ब-यापैकी कमी होत चालले आहे. पूर्वीप्रमाणे जनजीवन सुरळीत होत आहे. सर्वांची दिवाळी आनंदात जाईल अशी अपेक्षा करुयात असे म्हणत पिंपरी-चिंचवडकरांना भोसले यांनी दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
























Join Our Whatsapp Group