पिंपरी (Pclive7.com):- मंत्रालयातून शस्त्र परवाना मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एकाची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन २०१८ मध्ये पाषाण येथील कॅफे कॉफी डे आणि वाकड येथे घडला.
याप्रकरणी योगेंद्र रतिलाल गांधी (५४, रा. रहेजा गार्डन वानवडी) यांनी शुक्रवारी (दि. १८) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, माधव भुजंगराव गवळी (३५, रा. चिपळूण, रत्नागिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना आपली मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून त्यांचा नामंजूर झालेला शस्त्र परवाना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले.
मात्र, तरीही फिर्यादी यांचा शस्त्र परवाना मंजूर झाला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीकडे दिलेले पैसे माघारी मागितले. त्यावेळी आरोपीने पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ करीत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.