पिंपरी (Pclive7.com):- मुलींचे फोटो ऑनलाईन पाठवून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. वेश्याव्यवसायातून तीन पीडित महिलांची सुटका केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड येथील हॉटेल कामिनी येथे शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी ही कारवाई केली.
या कारवाईत जॅक, बबलू आणि करण यांच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जॅक हा व्हॉट्सअॅपवरून वेगवेगळ्या मुलींचे फोटो गिराहिकांना पाठवून वेश्यागमनासाठी मुलींची निवड करण्यास सांगत होता. त्यानंतर गिराहिकांना वेगवेगळ्या हॉटेलवर बोलवायचा. त्यानंतर हॉटेलवर आरोपी हे संबंधित पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होते. आरोपी हे ऑनलाईन पद्धतीने सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या चिंचवड येथील हॉटेल कामिनी येथे कारवाई केली. यात दिल्ली येथील दोन व छत्तीसगड राज्यातील एक अशा एकूण तीन पीडित महिलांची सुटका केली. तसेच ४,६०० रुपयांची रोकड व २० रुपये किमतीचे इतर साहित्य, असा एकूण ४,६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.