पिंपरी (Pclive7.com):- देशातील सडक निर्माण करण्याचे काम दर्जात्मक व्हायला पाहिजे. पण, अधिकारी, त्यांचे नातेवाईकच ठेकेदार झाले आहेत. या सर्वांची मिलीभगत झाल्याने रस्तांचे काम दर्जात्मक होत नाही. त्यावर सरकारने लक्ष देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. तसेच ताथवडे-पुनावळेसह अन्य ठिकाणी नवीन डीपीआर करुन रुंद सर्व्हिस रोड निर्माण करावा. लोणावळ्यापासून जाणा-या NH4 या मार्गावर कार्ला, कान्हेफाटा, वडगाव या ठिकाणी ओव्हर ब्रीज करण्याची मागणीही त्यांनी आक्रमकपणे केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या चर्चेत शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांनी सहभाग घेतला. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या समस्या मांडल्या. खासदार बारणे म्हणाले, देशातील पहिला एक्सप्रेस वे मुंबई-पुणे हा नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विकसित केला. त्याची संकल्पना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण चतुष्कोण योजनेच्या माध्यमातून सीमांपर्यंत रस्ता जोडण्याचे काम झाले.
सुरुवातीच्या काळात सीआरपीएफ फंड सडक परिवहन मंत्रालयाकडे येत होता. त्यामुळे अधिक गतीने या मंत्रालयाच्या माध्यमातून काम होत होते. सडक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली जलदगतीने रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात होते. परंतु, सीआरपीएफ फंड अर्थ मंत्रालयाकडे वळविला आणि त्याचा सडक मंत्रालयाच्या कामावर परिणाम झाला. मागणीनुसार अर्थ विभाग सीआरपीएफ फंड सडक परिवहन मंत्रालयाला देतो. यात कालावधी जातो असे सांगत खासदार बारणे म्हणाले, देशात सडक निर्माण करण्याचे काम चालू आहे. ते काम दर्जात्मक व्हायला पाहिजे. पण, अधिकारी, त्यांचे नातेवाईक ठेकेदार झाले आहेत. या सर्वांची मिलीभगत झाल्याने रस्तांचे काम दर्जात्मक होत नाही. त्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भिवंडी-मुरबाड-पळसदरी हा राष्ट्रीय महामार्ग येतो. हा मार्ग एनएचफोर क्रॉसिंग करुन मुंबई-गोवा महामार्गाला मिळतो. या 19 किलो मीटरच्या मार्गावर एमएसआरडीसी आणि एमएसआरडी हे नियंत्रण करतात. या रस्त्याचे काम दर्जात्मक होत नसल्याच्या अनेकवेळा मी तक्रारी केल्या. पण, त्यात काही सुधारणा झाली नाही. माझ्या मतदारसंघातून देहूरोड-कात्रज हा बाह्यवळण रस्ता कोल्हापूरपर्यंत जातो. रिलाइंन्स कंपनीला त्याचे काम 2010 मध्ये दिले. पण, कंपनीने आजपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत.
याच रस्त्याला लागून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणा-या महामार्गावरील ताथवडे-पुनावळेसह अन्य ठिकाणी सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. आजूबाजूच्या नागरिकांना या रस्त्यावरुन जाता येत नाही. या बाह्यवळण रस्त्याचा नवीन डीपीआर तयार करुन सर्व्हिस रोड करावा. त्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध होईल. मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळ्यापासून जाणा-या NH4 या मार्गावर कार्ला, कान्हेफाटा, वडगाव या ठिकाणी ओव्हर ब्रीज करण्याची मी सातत्याने मागणी करत आहे. या मार्गावर अनेक अपघात होतात, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी ओव्हर ब्रीज करावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 248 डी हा तळेगाव-चाकण-शिक्रापुरवरुन जातो. तो सोलापूर हायवेला जोडला जातो. या कामाला मंत्री गडकरी यांनी मंजुरी दिली. परंतु, आजपर्यंत या कामाला गती मिळाली नाही. या संपूर्ण मार्गावर तळेगाव, चाकण एमआयडीसीचे साहित्य ने-आण करणारी जड वाहतूक असते. कंटेनर असतात. कंटेनरमुळे अपघात होतात. या कामाला गती द्यावी, अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली.
देहू-आळंदी हा पंढरपूरला जोडणारा मार्ग वेगात पूर्ण करावा
मावळ मतदारसंघात तीर्थक्षेत्र देहूगाव येते आणि बाजूला आळंदी आहे. देहू, आळंदीवरुन आषाढीवारीत पंढरपूरला पालख्या जातात. 10 ते 12 लाख वारकरी या पालख्यांमध्ये भक्तिभावाने सहभागी होतात. या पालखी मार्गाला मंजुरी मिळूनही अनेक ठिकाणी काम चालू झाले नाही. देहूपासून पिंपरी-चिंचवडला जोडणा-या रस्त्यामध्ये संरक्षण विभागाची जागा येते. ती जागा आजतागायत ताब्यात घेतली नाही. त्यामुळे या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. देहू-आळंदी हा पंढरपूरला जोडणारा मार्ग वेगात पूर्ण करावा. सडक मंत्रालयाच्या माध्यमातून हे चांगले काम होईल. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा डीपीआर मंजूर करुन केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाकडे गेला आहे. पण, आजपर्यंत एकाही रस्त्याला मंजुरी मिळाली नाही. या डीपीआरला मंजुरी दिल्यास ग्रामीण भागात चांगले काम होईल, असेही खासदार बारणे म्हणाले.