पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील वाहनांना थांबण्यास परवानगी नसतानाही, पावसाळ्यामुळे लहान मोठे धबधबे पाहण्यासाठी घाट रस्त्यांच्या बाजूला बोगद्याजवळील मार्गालगत वाहने थांबविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन – एमएसआरडीसी) वाहतूक पोलिसांच्या मदतीने गर्दी किंवा धबधब्यांच्या ठिकाणी आवर्जून थांबणाऱ्या वाहनांवर आता कारवाई केली जाणार आहे. अशी ठिकाणे महामंडळाने निश्चित केली आहेत.
पावसाळ्यामध्ये पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर विशेषतः ओडोशी बोगदा, खंडाळा बोगदा, लोणावळा घाट आणि डोंगरमाथ्यामधून जाणार्या नागमोडी वळणांच्या ठिकाणी छोटे मोठे धबधबे वाहतात. तसेच निसर्गरम्य वातावरण असल्याने या ठिकाणी वाहनचालक सर्रास महामार्गालगत वाहने लावतात. धबधब्यांवर तसेच घाटरस्त्यात गर्दी करत आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तर अनेक ठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी धोकादायक ठिकाणांच्या माहितीचे फलक आणि वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस आणि महामंडळाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तरीदेखील वाहन थांबविणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे म्हणाले, महामार्गाच्या घाट रस्त्यांचा भाग दरडप्रवण असल्याने मागील दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संरक्षक जाळ्या, कॉक्रीट वॉल, डायगोनल टॉप रोप, शॉटक्रिंट, गॅबियन वॉल बसविणे आदी प्रतिबंधात्मक कामे करण्यात आली आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गादरम्यान असणाऱ्या धोकादायक ठिकाणांची, अपघात होण्याची शक्यता असणाऱ्या वळणांची पूर्वकल्पना यावी म्हणून सावधानतेचे फलक महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत. तरी देखील महामार्गालगत चारचाकी वाहने उभी करण्यात येत असल्याने महामार्गावरील वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी किंवा अपघात घडत असतात आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी रस्ते महामंडळाचे विविध टप्प्यात सहा सुमो कार, गस्ती पथक, डेल्टा फोर्स, १२ दुचाकी वाहने आणि इतर कर्मचारी मदतीसाठी कार्यरत आहेत. गर्दीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस आणि महामंडळाचा एक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
– राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी