आळंदी (Pclive7.com – प्रसाद बोराटे):- गेले ३२ दिवस सुरु असलेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज (दि.२३) अखेर आळंदी मुक्कमी पोहोचली आहे. २१ जून रोजी सुरु झालेला पालखीचा प्रवास आज अलंकापुरीत येऊन पूर्ण झाला. १३ जुलै रोजी पालखीने परतवारी सुरु केली व अखेर आज (दि.२३) माऊलींची पालखी आळंदीत पोहोचली.
“ज्ञानोबा माऊली तुकाराम” या जयघोषाच्या गजरात वारकऱ्यांनी आळंदीत प्रवेश केला व वारी पूर्ण झाल्याचा आनंद लुटला. ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघालेली पालखी अखेर आषाढ वद्य दशमीला आळंदी मुक्कामी सुखरूप परत आली. मात्र यावेळी माऊलींच्या पालखीसोबत निघालेला अश्व तेवढा परत आला नाही. उद्या आषाढ वद्य एकादशीच्या दिवशी वारीची अधिकृतरित्या सांगता होणार आहे.
पंढरपूरहून निघालेली पालखी येताना अधिक अंतर एका दिवसात कापत येते. त्यामुळे १३ जुलै रोजी निघालेली पालखी वाखरी, वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव, वाल्हे, हडपसर, सासवड, पुणे अशा मार्गाने २१ जुलै रोजी पुण्यात दाखल झाली. गेले दोन दिवस पालखीचा मुक्काम पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात होता. काल सकाळी पालखीने आळंदीकडे प्रस्थान ठेवले.
आळंदी येथील धाकट्या पादुका येथे आगमन झाल्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर आळंदीत आगमन झाल्यावर भाविकांनी माऊली माऊलीचा नामघोष करत टाळ्यांच्या कडकडाटासह माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.