पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती अखेर रद्द झाली आहे. त्यांच्याजागी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची २ वर्षाच्या कालावधी करिता अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (दि.२२) काढले आहेत. तसेच गेल्या दहा दिवसापूर्वी स्मिता झगडे यांची झालेली नियुक्ती रद्द झाली असून त्या उपायुक्त पदावर कार्यरत राहतील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, श्री.प्रदिप बाबुराव जांभळे पाटील, उपायुक्त राज्यकर, वर्ग-१ (निवडश्रेणी) (सध्या प्रतिनियुक्तीने उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका) यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३९ – अ नुसार अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या पदावर प्रथमतः २ वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.
श्री. प्रदिप बाबुराव जांभळे पाटील यांची प्रतिनियुक्ती ही प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून २ वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येत आहे. जर त्यांची सेवा लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने शासनास आवश्यक वाटली तर प्रतिनियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांना परत बोलावून घेण्याचा अधिकार शासन राखून ठेवत आहे. जर त्यांची सेवा स्वीयेतर नियोक्त्याला आवश्यक वाटली नाही तर, त्यांच्या सेवा परत करण्याची मुभा स्वीयेतर नियोक्त्याला राहील. त्यांनी मूळ विभागाकडे परत जाण्याचा आपला उद्देश आहे, अशी कमीत कमी ३ महिन्यांची लेखी नोटीस शासनाला दिल्यानंतर त्यांना मूळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहील.
सदर प्रतिनियुक्ती ही महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून करण्यात येत आहे. श्री. प्रदिप बाबुराव जांभळे पाटील यांनी उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका या पदावरुन कार्यमुक्त होऊन प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.
Tags: Additional commissionerPcmc additional commissionerPcmc newsPradeep Jambhale PatilSmita Zagade

























Join Our Whatsapp Group