पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारणे गरजेचे आहे. त्यासाठी किवळे- रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी ते चतुर्श्रुंगी असा नवीन मेट्रो मार्ग तयार करावा. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपी) तयार करावा, अशी मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची दिल्लीत भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात नवीन मेट्रो मार्गाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी क्षेत्रांपैकी एक आहेत. जलद शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली. सध्या पुण्यात विविध मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. काही मार्गावर मेट्रो धावत आहे. त्यामुळे नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो धावत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. निगडीतून पुण्यापर्यंत नागरिकांना थेट मेट्रोने जाता येईल. पिंपरी-चिंचवडमधील वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता किवळे – रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी व सध्याच्या चतुर्श्रुंगी मेट्रो मेट्रो स्टेशनपर्यंत विस्तार करण्याची आवश्यक आहे. हा संपूर्ण मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी उद्देशांसाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी मेट्रो सेवा आवश्यक आहे

या विस्तारामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला एक नवीन चालना मिळेल. त्यामुळे या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासंबधी आवश्यक असणारी प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही सुरू करावी. हा मार्ग केल्यास पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय होईल. त्यामुळे याबाबतचा आराखडा करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.























Join Our Whatsapp Group