पुणे (Pclive7.com):- पुणे पोलिसांनी पुण्यातील बहुचर्चित मुंढवा आणि कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिला अखेर अटक केली आहे. अनेक दिवसांपासून पोलीस तिचा शोध घेत होते आणि ती परदेशात पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंढवा आणि कोरेगाव पार्क येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिला अखेर अटक केली आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणात झालेली ही पहिलीच अटक आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील सुमारे ४० एकर शासकीय जमीन, जी महार वतन जमीन म्हणून ओळखली जाते, तिच्या खरेदी-विक्रीत मुख्य सूत्रधार असण्याचा आरोप आहे. तिने मूळ जमीन मालकांकडून कधीही रद्द न होणारी ‘पॉवर ऑफ अटर्नी’ मिळवली आणि त्या आधारे ही जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस’ कंपनीला विकली.

हा व्यवहार करताना मुद्रांक शुल्कात मोठी सूट मिळवण्यात आली, ज्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांच्यावर यापूर्वी पिंपरी येथील ‘सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँके’ला बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे ६० कोटी रुपयांहून अधिक कर्जाचा चुना लावल्याचाही गुन्हा दाखल आहे.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजवानीला अटक करण्यात आली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून फरार होती आणि परदेशात पळून गेल्याचा संशय होता. पोलिसांनी यापूर्वी तिचा जबाब नोंदवला होता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू होती.
शीतल तेजवानीच्या अटकेमुळे या बहुचर्चित जमीन घोटाळ्यातील पुढील तपासाला गती मिळाली असून, यात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.























Join Our Whatsapp Group