महापालिका निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडमध्ये; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
पिंपरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीकरिता भाजपाने तयारी सुरू केली आहे. सर्व्हे आणि स्थानिक नेतृत्वाचा सल्ला घेऊनच भाजपाची उमेदवारी अंतिम केली जाणार आहे. आता उमेदवारी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भात आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना दिल्या असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या भाजपच्या या बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. युतीच्या बाबत आम्ही आग्रही आहोत, मात्र भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे एका जागेकरिता अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांचे मत जाणूनच युतीचा निर्णय घेतला जाईल. आता चार दिवस उमेदवारी अर्ज देण्यात येतील, पुढचे चार दिवस उमेदवारी अर्ज भरून घेतले जातील. त्यानंतर या सर्व अर्जांची छाननी करून ते अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत. सर्व्हे आणि स्थानिक नेतृत्वाचा सल्ला घेऊनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय हा प्रदेश पातळीवर घेतला जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘‘विकसित महाराष्ट्र’’ घडवण्यासाठी भाजपाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवणे आणि ‘‘शत प्रतिशत भाजपा’’ निर्धार यशस्वी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही विजयश्री खेचून आणू, असा विश्वास शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी व्यक्त केला.























Join Our Whatsapp Group