पिंपरी (Pclive7.com):- राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना ‘‘माणसं जोडणे आणि टिकवणे’’ याला अत्यंत महत्त्व आहे. लोकांसाठी काम करीत असताना आयुष्यभर लोकांमध्ये रहावे लागते. असाच पुन: प्रत्यय पिंपरी-चिंचवडकरांना आला. भाजपाचे शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांना मातृशोक झाला. काल कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांचा दशक्रिया विधी पार पडला. गेल्या दहा दिवसांत भोसरीतील त्यांच्या निवासस्थानी सांत्वन देण्यासाठी अक्षरश: रीघ लागली होती.
पुणे जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह अबालवृद्धांनी आमदार लांडगे कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार महेश लांडगे यांचे कुटुंब सर्वसामान्य कामगार- शेतकरी कुटुंब म्हणून ओळखले जाते. किसनराव लांडगे आणि हिराबाई लांडगे यांनी अत्यंत कष्टाने आणि सचोटीने आपल्या तीनही मुलांना वाढवले. महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात ‘वस्ताद’ म्हणून किसनराव लांडगे परिचित आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून दूध विक्रीपासून शेतात राबण्यापर्यंत आणि कुटुंब एकसंघ ठेवून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या हिराबाई लांडगे यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत नाती-गोती, गावकी-भावकीचा गोतावळा जपला.
आपल्या आई-वडीलांच्या संस्कारात आणि शिस्तीत वाढलेले आमदार महेश लांडगे यांनी तालीम ते राजकारण असा यशस्वी नेत्रदीपक प्रवास केला आहे. विविध क्षेत्रातील लाखो माणसं त्यांनी जोडली आहे. सचिन लांडगे यांनी कामगार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. टाटा मोटर्स कामगार युनियनचे ते अध्यक्ष आहेत. सुमारे २० हजार कामगारांचा त्यांनी जनसंपर्क जोडला आहे. तसेच, कार्तिक लांडगे यांनी उद्योग क्षेत्रात गरूडभरारी घेतली आहे. त्यामुळे तिघांचाही लोकसंपर्क दांडगा आहे.
दरम्यान, आमदार लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे निधन झाले. तत्पूर्वी, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले. त्यामुळे रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त दि.२४ सप्टेंबर रोजी रात्री कळल्यानंतर आमदार लांडगे आणि कुटुंबियांना आधार देण्यासाठी हजारो हितचिंतक सरसावले. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारासाठी भोसरी गावातील स्माशनभूमी परिसरात अक्षरश: जनसागर लोटला होता. राजकीय क्षेत्रातील २० ते २२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आमदार लांडगे यांनी अफाट जनसंपर्क जोडला. त्याचा प्रत्यय त्यांच्यावर दु:खाचा प्रसंग ओढावला त्यावेळी आला. एव्हढा प्रचंड लोकसमुदाय जोडणे आणि टिकवणे निश्चितच सोपे नाही.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात…
‘‘निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ।
राजहंस दोन्ही वेगळाली ।।
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ।
येरा गबाळाचे काय काम।।’’
तसेच, राजकारण आणि समाजकारण करताना लोकांची असलेली श्रीमंती वाढवणे आणि टिकवणे हे ‘‘येरा गबाळाचे काम नाही…’’ असेच म्हणावे लागेल.
आमदार महेश लांडगे आणि कुटुंबियांना मातृशोकाच्या दु:खातून सावरण्याची शक्ती आई तुळजाभवानी देवो. कै. सौ. हिराबाई लांडगे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो… अशी आदरांजली या निमित्ताने तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने व्यक्त करीत आहोत.
Tags: आमदार महेश लांडगेआमदार महेश लांडगे बंधूकमावली माणसांची श्रीमंतीकामगार नेतेकार्तिक लांडगेमातृशोकानंतर सांत्वनासाठी जनसागर लोटलासचिन लांडगे