६३१ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न; जप्तीची मोहीम तीव्र करणार – कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने थकीत मालमत्ता धारकांबाबत कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी असलेल्या 21 मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापैकी 12 मालमत्ता धारकांनी त्वरीत 92 लाख 93 हजार 473 रुपयांचा थकीत कर महापालिका तिजोरीत जमा केल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली. तसेच जप्तीची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार 971 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिल्या आहेत. तसेच या मालमत्ता धारकांकडे तब्बल 631 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 79 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत 362 कोटी रूपये कराचा भरणा केला आहे.
याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त देशमुख म्हणाले, चिखली आणि भोसरीमध्ये थकबाकी असलेल्या औद्योगिक आणि बिगरनिवासी 21 मिळकती जप्त केल्या आहेत. यापैकी 12 मिळकत धारकांनी त्वरीत 92 लाख 93 हजार 473 रुपयांचा थकीत कर भरला आहे. 9 मालमत्ता या सील केलेल्या आहेत. मालमत्ता सील केल्यानंतर यापैकी 5 जणांनी कराचा भरणा केला आहे. उर्वरित चार मालमत्ता धारकांनी अद्याप कराचा भरणा केला नाही. मालमत्ता जप्त केल्यापासून 21 दिवसांत कर न भरल्यास या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.
1361 मालमत्तांची याच महिन्यात होणार जप्ती!
पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 मालमत्ता आहेत. थकबाकी असलेल्या या मालमत्तांची ऑक्टोबर महिन्यातच जप्ती करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील 50 टक्यांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सोसायट्यांची यादी सुरू आहे. अशा सोसायट्यामधील ज्या फ्लॅटधारकाची 1 लाखांपेक्षा अधिक थकबाकी आहे, अशा निवासी फ्लॅटच्या जप्तीचेही याच महिन्यात नियोजन करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.
Tags: Nilesh DeshmukhPcmc Property taxPimpri Chinchwad Municipal CorporationTax Officeकर संकलनजप्ती कारवाईथकबाकी वसूलीनिलेश देशमुखपिंपरी चिंचवड महापालिकामालमत्ता करसहाय्यक आयुक्त