पिंपरी (Pclive7.com):- उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. धरणात सोमवार (दि.२९) पर्यंत ३४ टक्के पाणीसाठा होता. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असून, वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्याने साठा घटत आहे. पावसाळा लांबल्यास पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायत व नगर परिषदेला पाणी दिले जाते. एकट्या पिंपरी-चिंचवड महापालिकेस सर्वाधिक ५१३ एमएलडी पाणी दिले जाते. हे पाणी पवना नदीत सोडले जाते. शहरासाठी पवना नदी पात्रातील रावेत बंधारा येथून पाणी उचलण्यात येते.
गेल्या साडेचार वर्षापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक भागांत पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुरेसे पाणी मिळत नसल्याने अनेक मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना खासगी टँकरने पाणी मागवावे लागते. त्यांचा आर्थिक भुर्दंड सोसायट्यांना सहन करावा लागत आहे. असे चित्र असताना, पवना धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस घटत आहे. सध्या धरणात ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. ते पाणी १५ जुलैपर्यंत पुरेल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. मात्र, पावसाळा लांबणीवर पडल्यास पिंपरी- चिंचवड शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकरिने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन..
पिण्याच्या पाण्याचा घरगुती वापरासाठी काटकसरीने वापर करावा. पाणी हे शिळे होत नसल्याने शिल्लक असलेले पाणी फेकून देऊ नये. पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे. बागकाम व कुंड्यासाठी, घर किंवा इमारत व परिसर स्वच्छ करण्यासाठी, धुण्यासाठी वापरू नये. पाऊस लांबल्यास पाणी कमी पडू नये म्हणून नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची बचत करावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
Tags: पवना धरण


























Join Our Whatsapp Group