पिंपरी (प्रतिनिधी):- दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. हा आनंद द्विगुणित होतो तो ‘दिवाळी पहाट’मुळे, शहराच्या वेगवेगळ्या भागांत शब्द-सुरांच्या मैफली रंगत आहेत. निगडी, प्राधिकरणात शास्त्रीय गायक पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य कौस्तुभ कांती गांगुली यांच्या शास्त्रीय संगीताने आणि सुरांनी दिवाळी पहाट रंगली.
मुक्तीसोपान संगीत विद्यालय, दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम आणि रोटरी क्लब ऑफ निगडी, पिंपरी टाऊन, वाल्हेकरवाडी, पिंपरी, प्राधिकरण, चिंचवड मोरया, पुणे कॉस्मोपॉलिटन, पिंपळे सौदागर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्रात मंगळवारी संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक अमित गावडे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी,पिंपरी टाऊनच्या वर्षा पांगारे, वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, पिंपरीचे विमल रावत, चिंचवड मोरयाचे संजय सोंडेकर, पिंपळेसौदागरचे शाकुर सय्यद, रोटरी कल्ब ऑफ प्राधिकरणाचे विलास गावडे, पुणे कॉस्मोपॉलिटनचे सत्यजित उमरजीकर आदी उपस्थित होते.
शास्त्रीय गायक पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य कौस्तुभ कांती गांगुली यांनी आपल्या शास्त्रीय व सुगम गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत दिवाळीची संगीतमय भेट दिली. भटिया रागाच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. जॉनपुरी राग सादर केला. तसेच उपशास्त्रीय प्रकारातील गाणी गायली. बंगाली भाषेतील बोल सादर करुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वप्नील भिसे यांनी सुंदर अशी तबल्याची साथ दिली. तन्मय देवचके यांनी संवादिनी व साथसंगत केली.
यावेळी बोलताना हेमंत कुलकर्णी म्हणाले, ”सर्व रोटरी क्लब एकत्रिपणे चांगले कार्य करत आहेत. विविध समाजउपयोग उपक्रम राबविले जात आहेत”. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कापसीकर यांनी केले.






















Join Our Whatsapp Group