पिंपरी (प्रतिनिधी):- पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासनाचा विरोध असतानाही महापौर नितीन काळजे आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान मिळवून दिले. महापौर काळजे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या बोनस व सानुग्रह अनुदानाचा धनादेश पीएमपीएमएलचे अधिकारी पंकज गिरी यांच्याकडे देण्यात आला.
पीएमपीएमएल तोट्यात असल्यामुळे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी यंदा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान देता येणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र पिंपरी चिंचवड महापौर नितीन काळजे यांनी कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली.
तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची तातडीने बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार मुंढे यांनी आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापौर काळजे आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेत दोन्ही महापालिका दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान देण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच त्यांना कोणत्याही परिस्थितीत बोनस व सानुग्रह अनुदान देण्यात यावे, असा ठराव मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. संचालक मंडळाच्या निर्णयामुळे तुकाराम मुंढे यांनी देखील त्याला संमती दिली. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
महापौर काळजे व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या हस्ते पीएमपीएमएलचे अधिकारी पंकज गिरी यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या बोनस व सानुग्रह अनुदानाचा धनादेश संपूर्त करण्यात आला. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, जैवविविधता समिती सभापती उषा मुंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसेविका आशा शेडगे, निर्मला कुटे, आरती चोंधे, नगरसेवक उत्तम केंदळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group